IAPAR

Categories
Uncategorized

माकड, माणूस आणि डार्विन

(डार्विन या एकल नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने)

सुमारे दोन वर्षांपूर्वी माझी पत्नी मृणालिनी मला डार्विन विषयी काही सांगत होती. माझा आणि डार्विनचा संबंध शाळेच्या पाठ्यपुस्तकातला ‘उत्क्रांती सिद्धांताचा जनक’ इतपतच मर्यादित होता. दोन मार्काच्या गाळलेल्या जागा भरा किंवा जोड्या लावा मध्ये हे येत असे. आपण माकडापासून तयार झालो (!) या विचाराची मला तेंव्हा फार मजा वाटली होती. पण त्या दिवशी ती जे काही बोलत होती ते ऐकून मी थोडासा गडबडून गेलो होतो. मनुष्यप्राणी माकडापासून निर्माण झाला असं डार्विन म्हणालेलाच नाही हे ऐकून मी गोंधळून गेलो. म्हणजे लहानपणापासून आपण जे समजत होतो ते तसं नाहीये? अजूनही आजूबाजूला डार्विन विषयी कुणी काही बोललंच तर ते एव्हढच असतं. आणि ही सांगतेय कि ते तसं नाहीये! मग आम्ही खूप बोललो. डार्विनच्या संपूर्ण प्रवासाबद्दल तिनं अनेक विस्मयकारक गोष्टी सांगितल्या. मी तिला विचारले की ती डार्विनवर नाटक लिहू शकेल का? आणि तिनं होकार दिला!

डार्विन हा काही रूढार्थानं नाटकाचा विषय नाही. तो मुख्यतः अभ्यासाचा विषय आहे. विज्ञानाच्या आकलनामध्ये डार्विनचं योगदान ही काही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाही. नाट्यपूर्ण असली तरी. मग याचं नाटक करताना ते रंजक होईल का? की केवळ उपदेशपर चर्चानाट्य असं त्याचं स्वरूप असेल? तसं तर नक्कीच नको होतं. माणूस म्हणूनही डार्विन काही जगावेगळा नव्हता. चारचौघांसारखाच एक सामान्य मुलगा होता. शालेय अभ्यासात फारसं लक्ष नसलेला, वडिलांच्या दबावाला घाबरून राहणारा! पण आजूबाजूचं जग मात्र तो निरखून बघत असे. त्याला भटकंतीची नितांत आवड होती. दगड, किडे, फुलपाखरं, झाडं याचं निरीक्षण करताना तो तासनतास रमून जात असे. या गोष्टीचं नाटक होऊ शकेल?

हे नाट्यलेखन आणि मग नाट्यनिर्मिती ही एक दीर्घकालीन प्रक्रिया होती. मृणालनं नाटकाचा पहिला मसुदा फार लवकर पूर्ण केला. आणि मग नंतर दुसरा आणि नंतर तिसरा… आणि मग त्यावर काम करण्याची माझी पाळी होती. आणि याच सुमारास जगामध्ये कोरोना हा एक नवा शब्द उदयाला येत होता. फार काही समजायच्या आतच त्यानं संपूर्ण जगाचा ताबा घेतला. आणि मग उत्क्रांतीच्या प्रक्रियेतली ही नवी मजा बघत डार्विन विंगेत जाऊन थांबला!

या प्रक्रियेमध्ये मला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. हे नाटक काही डार्विनचे चरित्र नव्हे. ही एका शास्त्रज्ञाची अशी जीवनगाथा आहे जिच्यामुळे मानवजातीचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. त्याच्या संशोधनामुळे माणसांत, माणसाच्या जगाविषयीच्या आकलनात मोठा फरक पडला.  

डार्विन ज्या कालखंडात होता त्या काळात विज्ञान हे धार्मिक कल्पनांच्या पलीकडे जाऊ शकत नव्हतं. तशी परवानगीच नव्हती. गलिलिओला ज्या प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला होता त्या परीस्थितीत इतकी शतकं उलटून गेल्यावरही फारसा फरक पडलेला नव्हता. परमेश्वराच्या अस्तित्वाला आव्हान देणं हा काही डार्विनचा हेतू नव्हता, पण त्याच्यासमोर जे उलगडत होतं त्यामुळे त्या परमेश्वराविषयी खूपच प्रश्न निर्माण होत होते. ख्रिश्चन चर्चच्या मान्यताप्राप्त चौकटीला न मानवणारं काहीतरी त्याला गवसलं होतं.

मृणालनं लिहिलेल्या संहितेमध्ये तीन भाग आपल्या समोर येतात. पहिला भाग हा डार्विनच्या बालपणीचा आणि तरुणपणाचा आहे. या वयात त्याला अनेक प्रश्न पडत होते आणि त्यांची उत्तरं त्याला पाठ्यपुस्तकांमध्ये सापडत नव्हती. त्याची शोधक नजर आणि संशोधक वृत्ती यांना खतपाणी मिळत होतं. आयुष्यभराचे मित्र जोडले जात होते. त्याही काळात मेडिकलला अडमिशन घेणं सामाजिकदृष्ट्या महत्वाचं होतं. त्याच्या वडिलांची तशी दृढ इच्छा होती. पण त्याला मात्र मेडिकल शिक्षणात रस वाटत नव्हता. या स्थितीतून मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या समोर एक मोठी संधी आली. पृथ्वी प्रदक्षिणा करण्याच्या एका सफरीची. इथून या नाटकाचा दुसरा भाग सुरु होतो. एच. एम. एस. बीगल या जहाजावरून त्यानं केलेली पृथ्वी प्रदक्षिणा, त्याला झालेलं जगाचं दर्शन, आपल्या समोर येतं. दक्षिण अमेरिका, पसिफिक महासागर, गालापागोस बेटसमूह, हिंदी महासागर अशा विविध ठिकाणांना भेटी देत त्यानं आपला अभ्यास सुरु ठेवला होता. आणि त्या सगळ्याचा अन्वयार्थ लावण्याचा त्याचा प्रयत्न आपल्याला दिसू लागतो. आणि तिसऱ्या भागात आपल्याला दिसतो तो या सगळ्या गोष्टींकडे एकविसाव्या शतकात येऊन बघणारा डार्विन. जुन्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता नवनवीन प्रश्न शोधणारा आणि त्यांची उत्तरं शोधण्याची जबाबदारी प्रेक्षकांची आहे याचं भान देणारा.   

ही डार्विनची गोष्ट प्रेक्षकाना कशी बरं सांगावी? डार्विन स्वतः त्याची गोष्ट सांगत असेल का? की एकविसाव्या शतकातील एक अभिनेता ही गोष्ट सांगत असेल? डार्विन आणि निवेदक अशी दुहेरी भूमिका निभावणारा अभिनेता असेल का? तो केवळ कथावाचक असेल? की प्रेक्षकांना कथा सांगता सांगता अनुभवही निर्माण करणारा असेल?

लॉकडाऊनच्या काळात या प्रश्नांशी आम्ही दोघेही लढत होतो. हा प्रयोग एकाच नटानं करण्याचा आहे हेही एव्हाना अगदी स्पष्ट होतं. आणि ते मीच करावं असंही वाटत होतं. त्यामुळे ते दिसेल कसं याबरोबरच ते पाठ कसं करायचं याचंही एक ओझं होतंच. चार-पाच वर्षांपूर्वी अनिरुद्धनं बसवलेल्या ‘पार्टी’ या नाटकात काम केल्यापासून माझाही अभिनयाचा उत्साह थोडा वाढलेला होता. आणि डार्विन हे त्या दृष्टीनं उत्तम आव्हान होतं.

या दरम्यानच्या काळात मी अजून एका एकल प्रयोगावर काम करत होतो. आदिती वेंकटेश्वरन या गुणी अभिनेत्री आणि नर्तिकेनं लिहिलेलं ‘Fall Again, Fly Better’ हे इंग्रजी एकल नाटक आम्ही स्काईपवर तालमी करून तयार करत होतो. त्यामुळे ते पूर्ण झालं की डार्विन करायला घ्यायचं असं ठरवलं होतं. ते नाटक हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्यामुळे त्याविषयी सविस्तर पुढे लिहीनच. त्या नाटकाचा पहिला प्रयोग नाट्यगृह खुली होताच झाला आणि मग डार्विनच्या तालमी सुरु झाल्या.   

डार्विनची तालीम सुरु करण्यापूर्वी मृणालला हे नाटक डॉ. मंदार दातार या संशोधक मित्राला वाचून दाखवायचं होतं. मंदार पुण्याच्या आघारकर संस्थेत संशोधक म्हणून कार्यरत आहे. आणि डार्विन हा त्याचा अत्यंत प्रेमाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्याच्यासमोर नाटकाचं वाचन झालं. त्यानं हिरवा बावटा दाखवल्यानंतरच तालमीला सुरुवात झाली.

तालीम करताना सुरवातीचा पुष्कळसा काळ हे आपल्याच्यानं पाठ होईल का या चिंतेत गेला. मी एकल प्रयोग केल्याला काही दशकं उलटून गेली होती आणि मधल्या कालखंडात माझं संपूर्ण लक्ष दिग्दर्शन आणि प्रशिक्षणाकडे होतं. अभिनयाची सवयही सुटल्यासारखी झाली होती. पण नटाची म्हणून जी एक आंतरिक प्रक्रिया सुरु होते ती केंव्हाच झाली होती. आणि उभं राहून तालीम सुरु झाल्यावर अधिकाधिक मजा येत गेली. या तालमीला आदिती, आशिष वझे, विक्रांत ठकार अशी तरूण मित्रमंडळी हजर असत. त्यांची निरीक्षणं ऐकणं, सूचना ऐकून पुढच्या तालमीत योग्य ते बदल करणं अशा गोष्टी सुरूच होत्या. मृणाल तालमीला आली तर मला जरा अधिक टेन्शन येत असे. ती माझ्यापेक्षा अधिक अभ्यासू आहेच. विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य या विविध प्रांतांमध्ये ती लीलया मुशाफिरी करत असते. त्यामुळे तिनं लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला काही ना काही अत्यंत महत्वाचे संदर्भ असत. त्यातलं काहीही आपल्याकडून सुटू नये याची काळजी मी सातत्यानं घेत असे.

उभं राहून तालमी सुरु करताना नेपथ्याचा एक ढोबळ आराखडा माझ्या डोक्यात होता. टेबल-खुर्ची मला अपरिहार्य वाटत होतं. त्याव्यतिरिक्त अनेक छोट्या मोठ्या वस्तू वापरल्या जाणार होत्या. वेशभूषा कशी असावी यावरही बराच खल झाला. एक गोष्ट नक्की ठरली होती की डार्विनसारखं दिसण्याचा प्रयत्न करायचा नाही. पण तो कालखंड उभा करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करायचा. स्मिता तावरेनं ही जबाबदारी लीलया पार पाडली. तिच्या बरोबरीनं आशिष वझे यानंही अपरिमित कष्ट घेतले. नेपथ्य, वेशभूषा योग्य रीतीनं व्हावं यासाठी या दोघांनीही तुळशीबाग, लक्ष्मी रोड किती वेळा पालथे घातले त्याला काही अंतच नव्हता. नाटकाची प्रकाशयोजना विक्रांत ठकार यानं केलेली आहे. नाटक समजावून घेऊन, तालमींना नियमित हजर राहून, समोर निर्माण होणारं दृश्य अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यावर त्यानं भर दिला. डार्विनची अभ्यासिका, समुद्र, जहाज आणि इतर असंख्य जागा त्यानं प्रकाशयोजनेतून जिवंत केल्या. या नाटकाचं संगीत ही एक अवघड गोष्ट होती. ते एका काळाशी नाळ जोडणारं तर हवंच होतं, पण त्याबरोबरच त्यामध्ये कुठलाही परकेपणा नको होता. नाटक बघताना प्रेक्षकाला सहज आपल्याबरोबर घेऊन जाणारं हवं होतं. संगीताबरोबरच विविध ध्वनींचाही वापर यात होता. आदितीनं हे सगळं अतिशय उत्तम रीतीनं पेललं. डार्विनचं आवडतं संगीत कुठलं होतं ते तिनं शोधून काढलं आणि त्याचाही यथोचित वापर केला. एकूणात काय तर प्रयोगाचं रसायन चांगलं जमून येत होतं.

या नाटकाच्या शेवटाकडे एक वाक्य आहे:

“खरी गोष्ट तुम्ही जाणता… आपण काही माकडापासून झालो नाही, माणूस काही माकडापासून झाला नाही. तर माणूस आणि माकड यांचा पूर्वज एक होता.”

हे वाक्य म्हणताना समोर बसलेल्या अनेक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर मला एक भलं मोठं प्रश्नचिन्ह दिसतं. कारण आपल्यापैकी अनेकजण खरी गोष्टी जाणत नाहीत! या नाटकाच्या निमित्तानं अशा अनेक खऱ्या गोष्टी जाणून घेता आल्या. डार्विनचा हात धरून दोन मार्कांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करता आला. विज्ञानाकडे वेगळ्या नजरेनं पाहता आलं.

नाटकाच्या प्रत्यक्ष प्रयोगाविषयी याहून अधिक काही लिहित नाही. डार्विनच्या आणि बीगलच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात होईलच. सध्याची बंदिस्त स्थिती लौकरच संपून जाऊ दे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष रंगमंचावर याचा प्रयोग करता येऊ दे हीच सदिच्छा. भेटूच!

विद्यानिधी वनारसे (प्रसाद)
भ्रमणध्वनी: +९१ ९१३०० २५७५६
इमेल: iapar.india@gmail.com

‘माकड, माणूस आणि डार्विन’ हा लेख यापूर्वी कणकवली येथील कै. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या ‘रंगवाचा’ या त्रैमासिकात प्रकाशित झाला आहे.