IAPAR

Categories
Uncategorized

कोरोना आणि कलेचा ‘काळ’

कोरोना या प्रकरणाविषयी २०२० सालच्या सुरवातीपर्यंत जनसामान्यांना कल्पनाही नव्हती. फारतर करोना नावाची एक बुटांची कंपनी माहित होती. जगाच्या इतिहासात येऊन गेलेल्या साथीच्या रोगांची माहिती शालेय इतिहासात येऊन गेली होती. आणि त्यावेळी तरी त्या माहितीची व्याप्ती वार्षिक परीक्षेबरोबर संपत होती. हे असं काही आपल्या अनुभवाला येईल याची पुसटशी कल्पनाही कुणी करत नव्हतं. आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्रगतीपथावर असलेली मानवजात आता यापुढे असल्या यःकश्चित आणि क्षुल्लक आजारांना अजिबात भीक घालणार नाही याची खात्री होती. आधुनिक मानव हा या सगळ्याच्या खूप वर आलेला आहे याविषयी कुणाच्याही मनात तिळमात्रही शंका नव्हती.

पण गतवर्षीपासून सगळं जग संपूर्णपणे कोरोनामय झालं आहे. कुठल्याही दोन व्यक्तींचं संभाषण हा शब्द किमान एकदा उच्चारल्याशिवाय संपत नाही. किमान एकदा!

या सगळ्या कालावधीत अनेक गोष्टी घडून गेल्या. सुरवातीला तर याचं गांभीर्य फारसं लक्षातही आलं नव्हतं. मार्च २०२० मध्ये जेंव्हा पहिला लॉकडाऊन झाला त्यावेळी, पंधरा दिवसांचा तर प्रश्न आहे असं वाटत होतं. फार तर तीन आठवडे… अगदीच ताणलं तर एप्रिल अखेर. एक क्षुल्लक व्हायरस तो काय… पण तो पुरून उरला. अजूनही आहे. आणि तो जाण्याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. उलट तो दीर्घकाळ आपली सोबत करणार आहे अशीच चिन्हं आहेत.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येईपर्यंत अनेकांची वाताहात झाली होती. शासकीय पातळीवर खूप धावपळ सुरु होती. या कालखंडात लोकांना मदत करायची म्हणजे काय करायचं हे लक्षात यायलाही खूप वेळ गेला. हा मुद्दा शासनाला दोष देण्याचा नाही. शासन म्हणजे आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांनीही हे कधी अनुभवलेलं नव्हतं. अचानक कुणीतरी डोक्यात दगड घातल्यासारखी शासनाची अवस्था झाली होती.

हे सगळं आत्ता लिहिण्याचं कारण म्हणजे या काळात कलावंतांची झालेली परवड. समाज म्हणून आपण कलेकडे आणि कलावंतांकडे कसे पहातो, शासन म्हणून आपल्या लेखी कलेची आणि कलावंतांची किंमत काय अशा प्रश्नांची काहीशी माहित असलेली पण मान्य करायला अवघड अशी उत्तरं स्पष्टपणे समोर येत गेली. आपल्या समृद्ध संस्कृतीच्या वारश्याचा (आणि तो समृद्ध आहेच) डांगोरा पिटत असताना तो वारसा सांभाळणाऱ्या मंडळींकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि अवहेलना असहनीय आहे. सर्व प्रकारच्या समाज घटकांचा विचार होत असताना कला आणि कलावंत यांचा स्वच्छपणे पडलेला विसर हा अंगावर येणारा आहे.  

कोरोनानं माणसाला स्वतःकडे पेशींच्या पातळीवरून बघायला शिकवलं. मोठी गोष्ट झाली. पण माणूस म्हणजे केवळ पेशींचा समूह नाही ना… त्याला जिवंत राहण्यासोबतच आपल्यातलं माणूसपण ओळखण्याची, जपण्याची आणि जोपासण्याचीही आस आहे. आणि कला ही माणसाला तिथवर नेणारी एक वाट आहे. कलावंताला डावलून या वाटेवर कसं चालता येऊ शकेल?  

बहुसंख्य कलाकार मंडळी ही हातावर पोट असणाऱ्या असंघटीत कामगारांप्रमाणे असतात. रोज काम केलं तरच त्यांना पैसे मिळतात. त्यांना कुठलीही नोकरी नसते. आणि कुठल्याही मेहनातान्याची हमी नसते. किमान वेतन कायदा नसतो. तुमच्या निगोसिएशन कौशल्यावर तुमचा मेहनताना ठरतो. याला अर्थातच काही अपवाद आहेत. पण मूलतः पैसे देणाऱ्याची मेहेरबानी महत्वाची होऊन बसते.

समाज म्हणून आपण कलावंतांच्या आर्थिक परिस्थितीविषयी संपूर्णपणे अनभिज्ञ असतो. “ते स्टार लोक आहेत! सेलिब्रिटी आहेत! बक्कळ पैसे मिळवतात!” हे वाक्य अत्यंत नगण्य अशा कलावंत संख्येला लागू होते. बहुसंख्य कलावंत हे ‘स्टार’ नसतात. ते कष्टकरी असतात. कला हे क्षेत्र त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेलं असतं पण त्याचा व्यवसाय कसा करायचा याची अनेकांना अजिबात कल्पना नसते. अर्थात यालाही आपले सामाजिक समज कारणीभूत आहेत. कला ही जन्मजात असावी लागते इथपासून ते विविध मंडळींना लहान किंवा तरूण वयात प्रती-लता, प्रती-आशा, प्रती-बच्चन, अशी विशेषणे लावून त्यांची शिकण्याची उर्मी संपवून टाकण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण करत रहातो. वेगवेगळे आयडॉल्स, सम्राट आणि सारेगंपुंच्या गोष्टी बघत राहतो. मला अनेकदा असं वाटतं की हा एक सामाजिक कट आहे की काय? कलावंताला महान म्हणायचं, त्याची कला अनमोल-अमूल्य आहे वगैरे म्हणायचं, त्याला मखरात बसवायचं आणि जवळ जवळ देवत्व बहाल करून टाकायचं. आणि एकदा देवत्व बहाल केलं की त्याला एक नारळ दिला तरी पुरतोच की! त्यालाही रोज दुपारी बारा वाजता भूक लागते याचं भान ठेवण्याची आपल्याला गरज भासत नाही.

कला आणि रंजन या दोन भिन्न गोष्टी आहेत याचंही आकलन आपण समाज म्हणून करून घेणं गरजेचं आहे. जे जे मनोरंजन करते ते सर्व कलात्मक असेलच असं अजिबात नाही. आणि रंजन करणं हीसुद्धा काही सोपी गोष्ट नाही. पण रंजन करतो म्हणून तो कलाकार असं समीकरण बनवलं की कलात्मकतेचा, सौंदर्याचा मुद्दा पूर्णपणे गौण करता येतो. प्रसिध्द होण्याची क्षमता हा कलेचा मापदंड नसतो. आणि हे लक्षात न घेतल्यामुळेच आपल्याकडच्या असंख्य पारंपारिक कला अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा उपयोग आपण तोंडी लावण्यापुरता आणि जाज्वल्य वगैरे अभिमान जागृत करण्यापुरताच करतो. प्रत्यक्षात त्यांच्या अस्तंगत होण्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही.

गेल्या वर्षभरात आपल्याला असं दिसतं की समाजाच्या विविध घटकांना उपयोग होईल, मदत होईल असे अनेक निर्णय शासकीय पातळीवर घेण्याचा प्रयत्न झाला. पण कलावंतांसाठी कुठल्याही प्रकारची भरघोस मदत झाली नाही. काही ज्येष्ठ कलावंतांनीच पुढाकार घेऊन आपल्या खिशातून आणि आपल्या काही मित्र मंडळींच्या मदतीनं कलावंताना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. बुडत्याला काडीचा का होईना, पण आधार मिळाला. तो स्पृहणीयच आहे. परंतु त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात काहीही घडताना दिसले नाही.

कामगारांच्या पाठीशी त्यांच्या संघटना असतात, व्यापारी संघटना असतात, चेंबर ऑफ कॉमर्स असतात, पण कलावंत हे दुर्दैवानं राजाची मर्जी बसण्याची वाट पहात राहतात. कधीतरी राजा माझ्याकडे बघेल आणि त्याच्या गळ्यातला मोत्याचा कंठा माझ्याकडे फेकेल या आशेने गात रहातात, नाचत रहातात, अभिनय करत राहतात.

कलावंत हा बहुतेक वेळा आंतरिक ओढीनंच हे सारं करीत असतो. त्याचा कलंदरपणा लपून रहात नाहीच. पण सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं, पण तो सहसा बिलंदर नसतो. त्यामुळे तो रसिक प्रेक्षकांना मायबाप वगैरे म्हणतो. पण ते मायबाप प्रयोग संपल्यावर त्याला अत्यंत निरपेक्षपणे वाऱ्यावर सोडून देतात हे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. यातही जे शहाणे असतात, हुशार असतात, त्यांना याचा सुगावा आधीच लागलेला असतो. ते स्वतःच्या जगण्याची घडी वेगळ्या पद्धतीनं बसवतात. आत्तासारख्या परिस्थितीत त्यांना याची झळ कमी लागते. पण त्यांचीही संख्या अर्थातच नगण्य.

या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकी सर्व व्यवहार सुरू झाले तरी नाट्यगृह सुरु होत नाहीत. मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळते पण नाट्यगृह बंदच ठेवावी लागतात. यातून कलावंताला हात चोळत बसण्यापलीकडे फारसं काही करताही येत नाही.

खरं सांगायचं तर नाट्यगृह बंदच राहणार हे समजल्यापासून कोरोनाचे धाबे दणाणले आहेत. आता आपलं कसं होणार अशी चिंता त्याला सतावू लागली आहे. तुळशीबाग, मंडई, लक्ष्मी रस्ता यापेक्षा हजारो पटींनी माणसं नाट्यगृहात असतात! तीच बंद झाली तर आपलं अस्तित्व कसं टिकणार? फक्त दिवसभराचा बाजार, रस्ते, ऑफिसेस, यांवर आपली गुजराण कशी होणार? आपल्याला संपविण्यासाठी या चतुर माणसांनी चक्क नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद करावीत? आमचा सर्वनाश करण्यासाठी असा रामबाण उपाय? आता अगदी नाईलाज म्हणून तुळशीबागेत जावं लागणार, मंडईत जावं लागणार, लक्ष्मी रोडवर जावं लागणार, उन्हातान्हात, भर पावसात आम्ही रस्त्यावर येणार… आमची हक्काची आणि लाडकी नाट्यगृह सोडून!

माझी तर खात्रीच झाली आहे की कोरोना हा एक नाट्यप्रेमी आणि चित्रपटप्रेमी जंतू आहे. (तसेही नाट्यप्रेमी आणि चित्रपटप्रेमी हे समाजाच्या दृष्टीनं जंतूच असतात). तो इतरत्र फारसा आढळत नाही. पण नाट्यगृह आणि चित्रपटगृह इथंच त्याचा मुक्काम असतो. या दोन जागा उघडल्या तर लाखोंच्या संख्येनं रसिकजन गर्दी करतील आणि कोरोनाला मेजवानीच मिळेल. सगळ्या जनतेला आता कलेचा आस्वाद घेण्याची इतकी आस लागली आहे की जिवाची पर्वा न करता तमाम लोक लोणावळा-खंडाळा आणि खडकवासला-सिंहगड या जागा रिकाम्या वाटाव्यात इतकी तुफान गर्दी करतील. धार्मिक आणि राजकीय उन्मादापेक्षा नाट्यगृह आणि चित्रपटगृह या जागा अधिक घातक आहेत. या दोन गोष्टी सुरु केल्या तर न भूतो न भविष्याती अशी परिस्थिती निर्माण होईल. कोट्यावधी माणसे मृत्युमुखी पडतील. आणि अशी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठीच बहुधा या दोन्ही जागा बंद ठेवण्यात येऊन बाकीचे सर्व व्यवहार जवळ जवळ पूर्ववत करण्यात आले असावेत.

आमचा पिंड नाटकाचा असल्यामुळे आम्ही आमच्या नाटकांचे प्रयोग जाहीर करतो आहोत. परंतु त्याची तारीख आणि वेळ आम्ही जाहीर करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला सात दिवस लागतील. सात दिवसांनी, आठव्या दिवशी काहीच न घडल्यास, अजून सात दिवस लागतील. असे किती काळ होईल याची आम्हांस कल्पना नाही. पण तोपर्यंत दहावा आणि तेरावा दिवसही उलटून गेला असल्यामुळे कावळाही शिवून गेला असेल. मग आम्ही प्रयोग करून तृप्त होऊ किंवा कलेच्या आणि कलावंतांच्या संपूर्ण मरणाची आणि पुनर्जन्माची वाट पाहू.

ता.क.: कावळा शिवला नाही तर तो त्रस्त समंध कुणाच्या मानगुटीवर बसेल ते काही सांगता येत नाही. कावळ्याचे तळतळाट लागू नयेत यासाठी संबंधितांनी आपापली काळजी घेण्याचा प्रयत्न करून बघावा.

अजून एक ता.क.: बहुतांचे जीव वाचविण्याच्या प्रयत्नात थोडेसे कलावंत मेले तरी फारसे काही बिघडत नाही. तसेही ते किरकोळच आहेत.

कलावंतांसाठी ता.क.: आपण विक्रम आणि वेताळ वाचूया… तशीही डोक्याची शंभर शकले होतच आहेत… पण विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही हे लक्षात ठेवूया..

#कोरोनाव्हायरसचाकोरस #नाटकमरूदे #संगीतमरूदे #नृत्यमरूदे #कलामरूदे